काश्मीर: 232 दिवसानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका, पीएसए अंतर्गत लावलेले आरोप रद्द

श्रीनगर- 232 दिवस नजरकैदेत राहिल्यानंतर आज जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सुटका झाली आहे. उमर अब्दुल्ला यांच्यावर पीएसए अंतर्गत नागरिकांना भडकवल्याचा आरोप लावण्यात आला होता. पोलिसांनी उमर यांच्यांवर लावलेले सर्व आरोप मागे घेतले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर 5 ऑगस्टला उमर यांना अटक केली होती. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार फारूक अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांनाही अटक करण्यात आली. फारुक अब्दुल्ला यांची 13 मार्चला सुटका करण्यात आली.


उमर अब्दुल्ला यांची बहिण सारा पायलटने पब्लिक सेफ्टी अॅक्ट 1978 (पीएसए) अंतर्गत भावाच्या अटकेला कोर्टात आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीर प्रशासनाला उमर यांची लवकर सुटका करण्याचे आदेश दिले. कोर्टाने म्हटले की, जर तुम्ही उमर यांची सुटका केली नाही, तर त्यांच्या बहिणीची याचीका मंजुर केली जाईल आणि त्यावर सुनवणी केली जाईल.


फारुक म्हणाले होते- मेहबूबा-उमरशिवाय सुटका अशक्य


नॅशनल कॉन्फ्रेंसचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांची १३ मार्चला सुटका करण्यात आली. नजरकैदेत फारूक यांचा कैदेचा कार्यकाळ तीन वेळा वाढवण्यात आला होता. सुटकेनंतर फारुक म्हणाले होते- उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या सुटकेशिवाय हे स्वातंत्र्य अपुरे. आता मी संसदेत लोकांचे म्हणने मांडेल.